वास्तू वेशीबाहेरली. जीर्ण पण भव्य निसर्गाने कुशीत घेतलेली. दाट झाडीत लपलेली. फारसं कुणी फिरकत नाही या मंदिराकडे. एक अनाथ जीव मात्र येथे रात्रीचा येतो. दिवसभर गावात भीक मागून थकल्या भागल्या शरीराला विसावा देण्यासाठी आणि काटा उभा राहतो चिऱ्याचिऱ्यावर, करुण-भावनोत्कट स्वरांनी. गाणं भाबडंच. श्रांत मन रिझवण्यासाठी, एकटेपणाची जाणीव बुझवण्यासाठी मनाचा हा एकमेव विरंगुळा जखमांचा रक्तस्राव थांबविण्यासाठी. अरण्याच्या भव्यतेतून उमटलेले त्याचे पडसाद तीच त्याला सोबत. गाता गाता तो बेभान होतो. पार विसरतो भिकारडं जिणं-त्याच आनंदात मशगूल-निद्रा त्याला पांघरूण घालते...
Read moreआज दोन दिवस बोचऱ्या थंडीचा कडाका पडला आहे. सकाळी सातला निघालो. उजाडलेलं असूनसुद्धा दोन पावलांपुढचं दिसणार नाही एवढं दाट धुकं. ह्या धुक्यामुळंच आठ वाजता सुटणारी कोल्हापूरची बस चुकली. अरसीच्या मोटारस्टॅंडकडे पायपीट करणं भाग आहे. जवळचा रस्ता जंगलातून गेलेला. बंदीपूरचं घनदाट अरण्य. साग, चंदन, निलगिरी आणि कित्येक प्रकारच्या उंच वृक्षराईतून गेलेला रस्ता. पायाखाली निलगिरीचा सुकलेला पाचोळा चुरगळला जाऊन होणारा आवाज. सुरेल शीळ घालणाऱ्या नवरंग पक्ष्यांची उत्तरंप्रत्युत्तरं. लांबून कुठूनतरी ऐकू येणारा हत्तींच्या गळ्यांतल्या घंटांचा नाद. बस्. एवढीच जाग...
Read more