STORY

अब नथ्थन जा रहा है.- अरविंद विष्णु मुळगावकर

आज दोन दिवस बोचऱ्या थंडीचा कडाका पडला आहे. सकाळी सातला निघालो. उजाडलेलं असूनसुद्धा दोन पावलांपुढचं दिसणार नाही एवढं दाट धुकं. ह्या धुक्यामुळंच आठ वाजता सुटणारी कोल्हापूरची बस चुकली. अरसीच्या मोटारस्टॅंडकडे पायपीट करणं भाग आहे. जवळचा रस्ता जंगलातून गेलेला. बंदीपूरचं घनदाट अरण्य. साग, चंदन, निलगिरी आणि कित्येक प्रकारच्या उंच वृक्षराईतून गेलेला रस्ता. पायाखाली निलगिरीचा सुकलेला पाचोळा चुरगळला जाऊन होणारा आवाज. सुरेल शीळ घालणाऱ्या नवरंग पक्ष्यांची उत्तरंप्रत्युत्तरं. लांबून कुठूनतरी ऐकू येणारा हत्तींच्या गळ्यांतल्या घंटांचा नाद. बस्. एवढीच जाग. बाकी अगदी सामसूम. बाहेर आता सूर्य वर आलेला आहे. इथे मात्र बारा वाजल्यानंतरच एखाद्-दुसरा कवडसा पडेल.थेट वर पाहिल्यानंतर मधूनच निळ्याभोर आकाशाचं दर्शन होणार. साग आणि निलगिरी माना उंच करून बाहेरचं विश्व पाहण्यात दंग आहेत. आकाशाला भिडणाऱ्या त्यांच्या उत्तुंगतेशी केवळ एकाच गोष्टीची तुलना होऊ शकेल-ती म्हणजे माझ्या नथ्थनची तान. त्यांच्या डोलण्यातून निर्माण होणारी नैसर्गिक लयकारी!कुठल्याही ऋतूत कुठल्याही वेळेला पाहिलं असता ह्या निसर्गाचं होणारं उदात्त आणि देखणं दर्शन. नथ्थनच्या अवीट गाण्याची केवळ या गोष्टींशीच तुलना होऊ शकते. मैफल जिंकावी ती नथ्थननेच. अगदी आव्हानपूर्वक-हमखास. आज ह्या हैदरबक्षाने हिंदुस्थानातल्या अनेक अवलियांबरोबर, पंडित-उस्तादांबरोबर सारंगी वाजवली. पण नथ्थनच्या तोडीचा गवय्या अद्याप नाही भेटला. बुलंद गळ्यातून निघालेली तयार दाणेदार तान माझ्या सारंगीने जर टिपली नाही, तर दुसऱ्या क्षणाला तिचं सही सही सरगम त्याच तयारीत ऐकवणारा एकटा नथ्थनच!पुन्हा या कसरती होत असताना हा सम अगदी अनपेक्षितपणे अचूक पकडेल. लय-ताल तर त्याच्या नसेतच भिनले आहेत.

नथ्थनचं कालच चिहलूम झालं. नथ्थन आज ह्या जगात नाही. ते गोरेपान रुबाबदार शरीर कब्रस्तानातल्यामातीशी एकरूप होऊ पाहत आहे ह्या दुष्ट विचारावर विश्वासच बसत नाही. कानांत अखंड गुंजतो आहे तो त्याचा बुलंद धारदार आवाज!

‘जावो जावो काहे ठाडे डारे गरे बैय्यां...’ घशातल्या अखेरच्या खरखरीतून केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उमटलेले ते शब्द-ते स्वर आज एकेचाळिसाव्या दिवशीही नुकत्याच उमलत असलेल्या मोगरीच्या सुवासाप्रमाणे ताजेतवाने वाटताहेत.

वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आग्र्याची. दुपारची वेळ. त्यात उन्हाळा. खसच्या पडद्यांवर पाणी मारून तुफेल व निस्सार दोघेही थकले होते. पाणी शिंपडलं की पाच मिनिटांत पडदा कोरडा ठाक! पण खसची खुश्बू मात्र खूप दरवळत होती. घरातल्या काळोखात थंडगार वाटत होतं. नथ्थनची अखंड बडबड चालू होती. ठर्र्याचे पेले एकामागोमाग एक रिते होत होते. इतक्यात-नबाब मीर जाफर अली खाँसाहेबांचा माणूस आला. नथ्थनचा शोध घेत घेत तो माझ्या घरी येऊन पोहोचला होता. नथ्थनला गाण्यासाठी नबाबसाहेबानी दावत दिली होती. म्हैसूरचे महाराज चामराज त्यांचे पाहुणे होते. त्यांना कुणी सांगितलं, ‘आगरे के दो ताज हैं-एक ताजमहल और दूसरा नथ्थनखाँ आग्रेवाला!’ नथ्थनला आणण्याची जिम्मेदारी मी पत्करली. नथ्थनचा शराबी शौक आवरणं आवश्यक होतं. ‘बेटे तुफेल, यह बोतल चुपचाप ले जाइओ और आधा हिस्सा पानी मिला के लाइओ।’ येता-येताच मी तुफेलला सांगितलं. तसंच रसोईत हुकूम सोडला, ‘अजी, नाश्ता लगवाइओ, कंबख्त भूख बडी जोर से लग रही है’...

नबाबसाहेबांच्या अलिशान दिवाणखान्याला काही औरच नजाकत आली होती. महाराजांची आदब ठेवण्यासाठी ठेवणीतली चीजवस्तू बाहेर निघाली होती. नक्षीदार पर्शियन गालिच्यावर किरमिजी मखमलीच्या अभ्ऱ्यांचे तक्के लोड मांडले होते. ठिकठिकाणी चांदीचे नक्षीदार मुरादाबारी हुक्के-त्यातले धुमसणारे निखारे डोळ्यांना सुखवीत होते. विलिंग्डनसाहेबांनी नजर केलेली, खास बेल्जमहून आणलेली दोन भव्य झुंबरं उंच तख्तपोशींना लटकत होती. ठिकठिकाणी इत्तरदान, पानदान वगैरे गोष्टींची विपुलता होती. उंची धूप-उदबत्त्यांची वलयं उमटत होती. महाराजांनी तशरीफ ठेवल्यानंतर नथ्थनने तानपुरे पुन्हा मिळवले. मलंग तबल्यावर व मी सारंगीवर. नबाबसाहेबांची, महाराजांची व मैफलीची इजाजत घेऊन नथ्थनने तानपुऱ्यात आपला षड्ज मिसळला, वाऱ्याच्या थंडगार झुळकीबरोबर रातराणीचा मंद सुगंध आल्यावर जसं वाटावं, ‘अहाहा!’ हा उद्गार निघावा, तितकीच हळुवार दाद मैफलीतून आली. छोट्याशा आलापीनंतर ‘मोऽऽहेऽऽमनाऽऽ‘. नथ्थनने ठेवणीतली बागेश्रीची बंदिश काढली. मग् मग् मनीधऽऽ..मलंगनेही लहानशी उपज घेऊन मध्य लयीतल्या तीनतालाची सम साधली. रागरचनेतच मींड अधिक. शुद्ध स्वरांचं वैपुल्य. कधी कोमल निषाद-गांधार, तर कधी शुद्ध धैवतावर मुक्काम. मधूनच पंचमाशी केलेला पाठशिवणीचा खेळ. थोड्याच वेळात काहीशा आर्त आणि धीरगंभीर वातावरणात मैफल डोलू लागली. नथ्थन हा कसलेला गवय्या. आवाज मोठा बुलंद, कुदरती. श्रोत्यांना प्रसन्न कसं करावं, त्यांची दाद कुठे मिळते, त्यांना कंटाळा कुठे येतो याचा खोल अभ्यास त्यानं केलेला. त्यामुळं नथ्थनवर गाणं जमवणं ही एक मुष्कील चीज होती. शागिर्दांना त्याचं एक सांगणं होतं, ‘महफिल यह रियाज करने की जगह नही-रियाज करने के बाद हासिल क्या किया है उसका छोटासा रुख महफिल में दिखाना चाहिये। छोटा सा वक्त, लेकिन इल्म बडा होना जरूरी है।’ लौकरच लयकारी सुरू झाली. तिस्र, चतस्र जातींमध्ये बोलताना फिरू लागल्या. मलंगची बोटे रंगात येऊन गाण्याच्या अंगाने तबल्यावर फिरू लागली. जागाजागांवर उत्स्फूर्त दाद मिळू लागली. तासाभरातच श्रोत्यांना चटका लावून नथ्थनने चीज आवरली. मैफल भानावर आली. चहापान, पानपट्ट्या वगैरे कार्यक्रम पार पडले. पुनः एकदा तानपुरे व इतर साज मिळवला गेला.

‘हैदर, अब मैं नटबिहाग गा लेता हूँ...’
मी क्षणभर बुचकळ्यात पडलो. बागेश्रीनंतर नटबिहागला हात घालायचा विचार!पण ह्यातच तर नथ्थनचं कसब होतं! त्याने पुन्हा एक पारंपारिक रचना काढली.
‘डमरू डम डम बाजे बाजे’
सा-, सा-, रे-, रे गम, प, गम, रे सा;
सां, सां, पम, मग, रे, सा, गनीप, मग,
निसां, रें, धनिप-, सा...

बघता-बघता श्रोत्यांच्या मनःपटलावरून त्याने बागेश्री हळुवारपणे पुसून टाकला. केवळ स्पर्श करून जाणाऱ्या एकाच कोमल निषादामुळे मुळातच नटबिहाग स्पष्टवक्ता वाटतो. कुणाचीही भीडमुर्वत न बाळगता तो मैफलीला जणू काही स्पष्टपणे समज देऊन सांगत होता की हा नथ्थन काही रागांचा गुलाम नाही, तर तेच नथ्थनचे बंदे आहेत ! नथ्थनने घातलेल्या जबरदस्त मोहिनीतून बाहेर पडायला सर्वांनाच जरा वेळ लागला. महाराजांनी आपल्या मनगटातलं सोन्याचं जड कडं काढलं व नथ्थनला नजर केलं. आपल्या दक्षिणी हिंदीत शब्द जुळवीत ते म्हणाले, ‘हम बहुत ही खुश हुए ! आपका गाना अच्छा लगा ! बहुत पसंद आया ! आप हमारे साथ म्हैसूर चलिये। आपको अच्छी तनखा, आमदनी मिलेगी।’

’आपका, अल्लाहतालाह का शुक्रगुजार हूँ। अभी तो कुछ नही कह सकता, लेकिन एक बार मैं आपके यहाँ जरूर आ जाऊंगा। मैंने म्हैसूर के दशहरे के बारे में बहोत कुछ सुना है।’नथ्थन म्हणाला.

 

त्यानंतर बरेच दिवस मला त्याचा सहवास लाभला नाही. वहिदखाँच्या आग्रहामुळे मी माझा मुक्काम कोल्हापूरला हलवला होता. एक दिवस मात्र अचानक त्याचं पत्र मिळालं. ‘मैं म्हैसूर जा रहा हूँ-चौदह तारीख के जुम्मे स्टेशन हाजिर हो जाना।’ मी सामानसुमान बांधून तडक म्हैसूरला निघून आलो. दुसरे दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास एक्स्प्रेस स्टेशनात शिरली. धावपळ करीत डबान् डबा पालथा घातला आणि एका डब्यात पथारी तशीच अजून पसरलेली आणि हा डोळे चोळीत बाजूच्या प्रवाशांना विचारतोय, ‘कौनसा स्टेशन आया है, बाबुजी?’ मी घाईघाईत त्याचं सामान आवरून त्याला उतरवून घेतलं. ठर्ऱ्याचा भयंकर भपकारा आला. प्रवासभर तो तेच करीत आला होता. आम्ही टांगा करून ललिता महालात आलो. महाराजांच्या दरबारबक्षींनी आमची राहण्याखाण्याची व्यवस्था एका आऊटहाऊसमध्ये केली आणि नथ्थनच्या आगमनाची खबर महाराजांना दिली. महाराजांच्या मनावर आग्ऱ्याच्या गाण्याचा खोल ठसा उमटला होता. त्यांनी रात्रीच्याच खास मैफलीची आज्ञा दिली. लांबच्या प्रवासाने खाँसाहेबांना शीण आलेला असेल तर उद्यापरवा मैफल ठरवल्यास बरं, वगैरे दरबारबक्षींनी सांगून पाहिलं पण महाराजांच्या लहरीपुढं त्यांचं काहीएक चाललं नाही. दरबारबक्षी फर्मान घेऊन आमच्याकडेआले. नथ्थनला शराब इतकी जास्त झाली होती की त्याला कपड्यांचाही होश नव्हता. घाईघाईनं त्यानं कुडता चढवला. मी दरबारबक्षींना नथ्थनच्या या अवस्थेची कल्पना दिली व त्याच्या नशेचा उतारा शोधण्यासाठी बाहेर पडलो. एखाद् दुसरं लिंबू मिळालं असतं तरी काम निभावलं असतं. पण राजवाड्याच्या परिसरापासून बाजार कुठेतरी दूर होता, त्यामुळे विचार सोडून द्यावा लागला. इथे दरबारबक्षींना वाटलं, थोडा प्रसाद सेवन केल्यानंतर खाँसाहेबांच्या गाण्याला रंग चढेल. म्हणून येतानाच त्यांनी दूरदृष्टीने एक छोटी बाटली विलायती दारू आणली होती. नथ्थनने पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिचाही समाचार घेण्यास सुरुवात केली होती.

झाले !रात्री दहाच्या सुमारास आम्ही दरबार हॉलमध्ये दाखल झालो. तानपुरे मिळवण्यातच अर्धा तास गेला. नथ्थननं गायला सुरुवात केली. तानपुऱ्याचा स्वर एकीकडे तर नथ्थनचा दुसरीकडे !श्रमांनी आणि बेछूट नशापानामुळं त्याचा नेहमीचा बुलंद आवाज दगा देऊ लागला. एखाद्या फेरीवाल्याच्या आवाजाप्रमाणं मध्येच फाटू लागला आणि मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात त्याची अस्पष्ट जाणीव झाल्यामुळं की काय, त्याला कंपही फुटू लागला. जीभ जड झाल्यामुळं चिजेचे शब्द बोबडे उमटू लागले आणि राग माझ्यावर व तबलियावर निघू लागला. आम्हांला तो मधे मधे डाफरू लागला. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही. ताड्कन उठून ते निघून गेले. झालं ! गाणं तिथंच संपलं. मैफली हमखासपणं जिंकणारा नथ्थन आज हरला होता. केवळ दारूच्या अतिसेवनामुळे. मी मोठ्या मुष्किलीनं त्याला घरी आणून झोपवलं. दुसरे दिवशी दुपारी बाराच्या सुमारास त्याला जाग आली. तोंड वगैरे धुवून चहा पोटात गेल्यावर त्याला खूपच तरतरी आली. इतक्यात दरबारबक्षी हातात दोन बटवे घेऊन हजर !

‘हे दोन हजार रुपये ! कालच्या गाण्याची बिदागी !आपण आता आपल्या गावी जाऊ शकता.’ दरबारबक्षी म्हणाले.

नथ्थनने चकित होऊन विचारलं, ’यह क्या मामला है, हैदरमियाँ?’ मी मनांतून चिडलो होतो ’यह आपकी तकदीर है।’

’लेकिन हैदर, यह क्या हुआ है? मेरे कुछ समझ में नही आता।’

’कैसा आयेगा-दिमाग में?कल आप ठर्रे में जो डूबे हुए थे? कल की महफिल की यह बिदागी है। उसे ले लो और सीधे आग्रे का रास्ता सिधारो।’ मी तावातावाने बोललो. माझ्या मनात धुमसत असलेला राग लपू शकत नव्हता.

आता कुठे त्याच्या डोळ्यांपुढे रात्रीचा एकंदर किस्सा उभा राहिला. ‘ला-हौल वला कुवत !’ त्या थैल्या त्याने दरबारबक्षीपुढे लोटून दिल्या. ’यह नथ्थनखाँ क्या बेवकूफ है जो किसी और गवय्ये की बिदागी ले ले? आज रात महाराज मेरा गाना सुनेंगे और उसके बाद ही यह नथ्थनखाँ आग्रेवाला यहांसे तशरीफ उठायेगा।’

दरबारबक्षी उठून गेले व त्यांनी महाराजांची कशीबशी समजूत घातली. महाराज तर खरे रसिलेच. त्यांनी खास मोठ्या दरबारात रात्रीची मैफल ठरवली. आणि काय सांगू, त्या रात्री जमलेला नथ्थनचा दरबारी आणि केदार हा हैदर जन्मात विसरणार नाही. तिथल्या तिथे एक पाणीदार मोत्यांचा कंठा देऊन महाराजांनी नथ्थनला दरबार गवय्याची नोकरी दिली.

आणि एक दिवस भास्करची तार आली. नथ्थन खूप आजारी झाला होता. मी त्याच दुपारी साडेतीन चारला म्हैसूरला पोहोचलो. व्हिक्टोरिया मेमोरियल हॉस्पिटलच्या एका खास कमऱ्यात त्याला ठेवलं होतं. आवारातच भास्कर भेटला. म्हणाला, ‘आप को बहोत याद कर रहे हैं।’

मी नथ्थनची खैरियत विचारली.

तो म्हणाला, ’मोठमोठ्या डॉक्टरांना त्यांच्या रोगाचं निदान होत नव्हतं. एकदा महाराज आले असतांना डॉक्टर म्हणाले की, आम्हांला कॅन्सरचा संशय आहे. ह्या आजारातून आता हे उठतील याची काही शाश्वती नाही. त्यांची रुबाबदार मूर्ती एक दीड महिन्यात अगदी पार सुकून गेलीय, डोळे किती खोल गेले आहेत, चेहरेपट्टीची हाडे वर आली आहेत. भरदार मनगटातलं मांस कुठल्याकुठं नाहीसं झालं आहे.’

भास्कर औषधांसाठी बाहेर गेला आणि मी वर नथ्थनच्या कमऱ्यात आलो.

‘क्यों नथ्थन मियाँ, अब कैसी है तबियत?’ मी विचारलं.

’अरे आवो आवो, हैदर...’ नथ्थन अशक्त आवाजात म्हणाला व उठण्याची कोशिश करू लागला. मी त्याला उठू दिलं नाही. त्या अवस्थेतच त्याने मला कडकडून मिठी मारली. खूप दिवस साचलेल्या प्रेमाश्रूंना वाट मोकळी झाली. आम्ही एकमेकांना पाच-सहा वर्षांनी भेटत होतो. थोड्या वेळाने भेटीचा भावनावेग ओसरल्यावर मी त्याच्या प्रकृतीची चौकशी करू लागलो. पण त्याचं माझ्या बोलण्याकडे लक्ष होतंच कुठे? त्याची निराळ्याच ठिकाणी समाधी लागली होती. त्याने मध्येच गायला सुरुवात केली. कोणत्याही क्षणाला प्राण निघून जाईल इतकी वाईट अवस्था. मी त्याच्या तोंडावर हात ठेवला. ‘यह क्या बेवकूफी है? यह क्या गाने का वक्त है-जगह है?’ मी कृतक् कोपाने म्हणालो.

त्याने माझा हात काढून टाकला आणि मोठ्या आर्त सुरात म्हणाला, ’बे कमनसीब ! सुन ले। अब नथ्थन जा रहा है। यह बात फिर नही सुनने में आयेगी।’

आणि, “जावो जावो काहे ठाडे डारे गरे बैयां” ही पिलूतली ठुमरी त्याने इतक्या सुंदर मुरक्या-हरकतींनी गायला सुरुवात केली की माझ्या डोळ्यांतून घळघळ पाणी वाहू लागलं. हुंदका आवरणं अशक्य झालं. तो पुन्हा म्हणाला, ’अबे सुन, रोता है क्या? नथ्थन जायेगा लेकिन यह रंग तो तुम्हारे पास रहेगा...!’

(अभिरुचि दिवाळी १९७७)
(संगणकीय टंकलेखन- चंद्रशेखर महाजन)