वास्तू वेशीबाहेरली. जीर्ण पण भव्य निसर्गाने कुशीत घेतलेली. दाट झाडीत लपलेली. फारसं कुणी फिरकत नाही या मंदिराकडे. एक अनाथ जीव मात्र येथे रात्रीचा येतो. दिवसभर गावात भीक मागून थकल्या भागल्या शरीराला विसावा देण्यासाठी आणि काटा उभा राहतो चिऱ्याचिऱ्यावर, करुण-भावनोत्कट स्वरांनी. गाणं भाबडंच. श्रांत मन रिझवण्यासाठी, एकटेपणाची जाणीव बुझवण्यासाठी मनाचा हा एकमेव विरंगुळा जखमांचा रक्तस्राव थांबविण्यासाठी. अरण्याच्या भव्यतेतून उमटलेले त्याचे पडसाद तीच त्याला सोबत. गाता गाता तो बेभान होतो. पार विसरतो भिकारडं जिणं-त्याच आनंदात मशगूल-निद्रा त्याला पांघरूण घालते.
दुतर्फा दाट झाडी.एक छोटीशी पाऊलवाट वळणावळणानं गावाकडे गेलेली. सरकताहेत पांढऱ्या कुडत्यावरून चांदण्याचे शुभ्र कवडसे. रातकिड्यांची किरकिर नि पायतणांची करकर, पावलापावलातून प्रकटणारं करारी व्यक्तिमत्व. कुदरती गळ्याच्या रियाझी सट्ट्याचा वेध घेत हिंडणारं. ‘ओऽऽमियाँ जानेवाले’-गडद शांततेचा भंग करणारा टप्पा आणि रेंगाळून विरलेली मींढ. कारण...दूरवर दिसणारा मिणमिणता दिवा, तिथूनच तरळत येणारे आर्त सूर. मस्तकात झिणझिण्या, अहंकाराला छेद. वाढतंय पावलापावलातलं अंतर, मागे पळताहेत चांदण्यांच्या सावल्या. ते आर्त सूर, भव्यतेतून उमटलेले त्यांचे पडसाद.
ह्या बाह्यतेजाला सहन नाही होत वर्चस्व. आवाजाची जानकारी, रियाझाचा दरबारी मानमरातब, रविकिरणांसारखी फाकलेली कांती. कमतरता नाही कशाची. फक्त एक व्यथा निपुत्रिकाची. क्रोध सदैव धारदार नाकावर. रक्ताला नाही सहन होत, कैद धमन्यांची. आमची जानकारी! आमचा गळा! अशाच शागीर्दास ही कला मिळेल. त्याला आम्ही दत्तकसुद्धा घेऊ. एकच अट, ब्राह्मण असला पाहिजे. सहन नाही होत विटाळ कुणाचाच, कशाचाच. ह्या अफाट दर्यात तो डुंबेल. वेताची छडी आणि रियाझ. आवाज कसदार, निघेल तान दाणेदार देखणी.
ही भूल तर नाही?कोण हा?कुठला?वाह, आवाज काय बुलंद!
धमणी धमणीतून खेळतंय-रक्त? नव्हे-लय! कासावीस होतोय जीव, ती कल्पनेची भरारी पाहून. अशा ठिकाणी? अशा आड वेळी? आमची समाधी लावण्याचं सामर्थ्य? कुणी गंधर्व तर नव्हे वाट चुकला? तालीम तर निश्चित नाही. म्हणजे सर्वच कुदरती! हिराच गवसला. सर्व पैलू पाडायला फारसा अवधी नाही लागायचा. जगन्नाथ करो आणि हे पोर ब्राह्मणकुळीचे निपजो. ऐकणार आम्ही, मनमानं ऐकणार. लागू दे तंद्री. भंग नको...
कितवी बांग? कोवळी उन्हं? छे! हा वाटचालीचा परिणाम. कुठाय तो पोर? अरे! म्हणजे हे स्वप्न की काय?
नाही आम्ही ऐश्वर्याचे भोक्ते, आमचा मुक्काम देवळातच. मैफलीचेवेळी उपस्थित होऊ...कलावंताची लहर!
नाही सामर्थ्य आमच्यात-भंग करण्याचं याच्या समाधीचा. लौकर उठू उद्या सकाळी.
‘गद्ध्या! तानपुरा कसा लागतोय. बोट ओढ. कुठाय आमची भांगेची गोळी?’...
स्पर्धा करताहेत सुरांची वलयं धूपउदबत्त्यांच्या वलयांशी. लाटा एकमेकांत गुंफताहेत-फुटताहेत समेवर. सुरांचे फेसाळतात तुषार अगणित. एकरूप होतात-पुनः फेसाळण्यासाठी. कल्पनेचे सूक्ष्म किरण चमकताहेत बिंदुबिंदूतून. भिडताहेत अंतर्गर्भात हृदयाच्या, शुद्ध गंभीर खर्जापासून नाजुक कोमल धैवतापर्यंत. चढला आहे स्वरसाज श्रोतृवृंदाच्या हृदयाचं स्पंदन वाढलंय. चढलाय-भिनलाय आलाप दरबारी कानड्याचा.
आणि प्रारंभ होतोय चीजेला-मधुर सुस्पष्ट शब्दांत.
बंधनवा बांधोरे बांधो सब मिलके मालनियां, महंमदशाह प्यारेके घर काजे
सदा रंगीले ताननसो बधावा गावो माई, सब साहेब हतसो हाजे
भिडतोय मृदंग स्वरास्वराला दाद देत. लय वाढतेय मुंगीच्या पावलानं. पिळदार तानेसारखंच चिवट व्यक्तिमत्व.
सुरांच्या आवर्तात गिरक्या घेतंय एक निष्पाप मन...
क्षणात डुंबतंय आनंदात...क्षणात निराशेनं झाकळतंय,
हे वेड लावणारे सूर...ही लयकारी कधी आत्मसात होईल? की हे सारं मृगजळच? दीनवाण्या चेहऱ्यावरची व्याकुळता. त्यानेच जाणलीय त्या सुरांची व्यथा!
‘ए, चल बाजू हट-विटाळ होईल आम्हांला’खाडकन् उतरली सुरांची बेहोषी. इमले ढासळलेत मनाचे. याचना थिजतेय फडफडणाऱ्या पापण्यांत!
ऊब आणतेय शाल अहंकाराला. गुदमरलंय मन कौतुकाने-
पण ओढाळ मनाच्या गाभाऱ्यात घुमताहेत स्वर त्या रात्रीचे.
पावलं झपझप पडताहेत. मंदिराच्या रोखाने. अव्यक्त सुरांच्या मागोव्यात. कळस दिसताहेत. तीक्ष्ण झाली आहे दृष्टी. गडद अंधाराच्या सान्निध्यात तो पायरीवर बसला आहे. मूक अश्रू ढाळीत, व्यथित-अपमानित.
दर्शन होतंय मूर्तीचं. जीर्ण वास्तूचं. आणेली घरंगळतेय पायरीवर. नेमाने. जी आदराने मस्तकाला लावली जाते. कधी तरी वाटतं-ते सूर घुमताहेत, परिसरात मंदिराच्या. पण तो केवळ भासच-कठोर नि वेडा. ध्यास लागलाय त्या स्वर्गीय सुरांचा-गायकीचा. कधीतरी भेटेल तो बादशहा सुरांचा. उत्कट आहे आशा-पण वेडी.
बंधनवा बांधो रे बांधो सब मिलके मालनियां चीज आत्मसात झालेली आहे.
हृदय पिळवटतंय. सूर गळ्यापर्यंतच दाटतात-कोंडतात-पिचतात. मुखावाटे बाहेर पडतात-कढ. दुःखाचे-अपमानाचे.
सुरावट कोमेजली आहे.
गंधर्व लुप्त झाला आहे.
उरल्या आहेत-फक्त निर्दय आठवणी.
- (राजहंस)